स्वामी विवेकानंदांचे मूर्तीपूजे बद्दल काय मत होते ? | Swani Vivekanand




स्वामी विवेकानंदांचे मूर्तीपूजे बद्दल काय मत होते ? | Swani Vivekanand

Swani Vivekanand १८९१ च्या फेब्रुवारीच्या आरंभी एके दिवशी सकाळी स्वामीजी अलवार संस्थानात येऊन पोहोचले . येथे त्यांना कळले की अलवारचे महाराज पाश्चिमात्य दृष्टिकोनाचे बनून गेलेले होते . म्हणून मग स्वामीजींची त्यांच्याशी चांगलीच शाब्दिक चकमक झाली . 


             स्वामीजीसारखा एक धडधाकट मनुष्य , पुन्हा विद्वान असे असूनही ते अशा प्रकारचे खुशालचेंडूपणाचे म्हणता येईल असे आयुष्य का जगत आहेत , या महाराजांच्या प्रश्नाला स्वामीजींनी तत्काळ प्रतिप्रश्न केला की , “ महाराज , प्रथम मला हे सांगा की , आपल्या दरबारातील कर्तव्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही आपला वेळ पाश्चिमात्यांच्या संगतीत का घालविता आणि शिकार खेळायला का जाता ? " महाराजांनी उत्तर दिले , " पाश्चिमात्यांच्या संगतीत मी वेळ का घालवीत असतो ते मला सांगता येणार नाही , पण मला तसे करणे आवडते यात काहीच संदेह नाही . " यावर स्वामीजी उद्गारले , " झाले तर ! अगदी याच कारणासाठी मी देखील एक साधू म्हणून परिभ्रमण करीत असतो . ”


            आणखी एक गोष्ट म्हणजे अलवारचे महाराज मूर्तिपूजेची चेष्टा करीत ; कारण त्यांच्या मते मूर्ती म्हणजे दुसरे तिसरे काहीही नसून केवळ दगड , माती वा धातूच होत . स्वामीजींनी त्यांना खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हिंदू लोक मूर्तीला प्रतीक मानून तिच्याद्वारे त्या  परमेश्वराचीच पूजा करतात . तरीही महाराजांची काही समजूत पटेना . मग स्वामीजींनी महाराजांच्या प्रधान मंत्र्यांना भिंतीवरची महाराजांची प्रतिमा खाली काढून ठेवायला आणि तिच्यावर थुंकायला सांगितले . स्वामीजींच्या या औद्धत्यपूर्ण वाटणाऱ्या आज्ञेने दरबारातला प्रत्येक जण भयाने थरथरू लागला . स्वामीजी महाराजांकडे वळून म्हणाले . " ही प्रतिमा म्हणजे काही हाडामांसाचे आपण स्वतः महाराज नव्हेत . तरीदेखील तिच्यामुळे आपलेच स्मरण होते ना ? आणि म्हणूनच या प्रतिमेबद्दलही आपणाइतकाच आदरभाव बाळगला जातो ना ? याचप्रमाणे एखाद्या मूर्तीमुळे भक्ताच्या मनात त्याच्या इष्ट देवतेचे अस्थित्वच जागृत  होत असते.  आणि ते त्या दैवतावर त्याचे चित्त एकाग्र करण्यास साहाय्यभूत ठरते , ही गोष्ट विशेषत : साधकाच्या आरंभकालीन जीवनात अगदी अत्यावश्यक असते . " राजेसाहेबांनी मग आपल्या अज्ञानीपणाबद्दल स्वामीजींकडे दिलगिरी व्यक्त केली .



Post a Comment

Previous Post Next Post